अर्धविरामा’चे सिंहावलोकन !श्री. स. गो. बर्वे यांच्या जीवनकार्याचा परामर्ष
द्रष्टे प्रशासक सदाशिव गोविंद तथा स.गो. बर्वे
पुणे महानगरपालिकेची स्थापन १५ फेब्रुवारी १९४९ मध्ये झाली. ब्रिटिश काळात पुणे शहर हे मुंबई इलाख्याची हंगामी राजधानी मानली जात असे, त्यामुळे queen of deccan पुण्याला मान. पुण्यात सदर्न कमांडचे मुख्य कार्यालय, संरक्षण खात्याच्या दारूगोळ्याची ‘अॅम्युनेशन फॅक्टरी’, ‘राष्ट्रीय संरक्षण अकादमी’ इत्यादी केंद्र शासनाच्या आधिपत्याखालील महत्त्वाची कार्यालये होती. ‘नॅशनल केमिकल लॅबोरेटरी’ पुण्यात स्थापन झाली. ‘पुणे विद्यापीठा’ची स्थापना नुकतीच झाली होती. शैक्षणिक क्षेत्रात तर पुणे आधीपासूनच आघाडीवर होते. त्या वेळी महानगरपालिकेच्या क्षेत्रात पुण्याच्या आसपासची गावं सामील करण्यात आली. आता पुण्याची लोकसंख्याही वाढू लागली. अशा या महत्त्वपूर्ण शहराच्या महानगरपालिकेचा कारभार सांभाळायला तितकीच कार्यक्षम आणि धडाडीची व्यक्ती नियुक्त करायला हवी हे जाणून पुणे महानगरपालिकेचे पहिले आयुक्त म्हणून श्री. सदाशिव गोविंद बर्वे, आय.सी.एस. यांची नियुक्ती करण्यात आली. ही निवड किती योग्य होती याची वारंवार प्रचिती सर्वांनाच आली.
पुणे हे कार्यक्षेत्र असलेल्या बर्वेचा जन्म मात्र सांगली जिल्ह्यातील तासगाव इथं झाला. २७ एप्रिल १९१४ ही त्यांची जन्मतारीख. त्या काळच्या प्रथेप्रमाणे त्यांचं दहाबारा माणसांचं एकत्र कुटुंब होतं. मूळचे कोकणातल्या नेवरे गावचे, वाड आडनाव असलेले हे कौशिक गोत्रोत्पन्न चित्पावन कुटुंब पेशवाईच्या उत्तरार्धात देशावर आलं आणि पेशव्यांनी त्यांना बर्वे नामाभिधान दिलं. पेशव्यांशी या घराण्याचे वैवाहिक नातेसंबंध जुळले आणि तेव्हापासून शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्य करणारे अनेक नामवंत या कुळात जन्मास आले. आपले चरित्रनायक सदाशिवराव हे अशा कर्तबगार घराण्याचे तितकेच कर्तृत्ववान वारस !
पेशव्यांच्या दक्षिण विजयाचे सूत्रधार असलेले सरदार परशुराम पटवर्धन हे तासगावच्या मुख्य गादीचे संस्थानिक. सदाशिवरावांचे आजोबा श्री. रघुनाथराव बर्वे हे सुसंस्कृत, सुशिक्षित होते. त्यांचे सुपुत्र दिवाणबहाद्दूर अण्णासाहेब तथा श्री. गोविंदराव हे त्या काळी बी.ए. पदवी संपादन करून ब्रिटिश सरकारच्या नोकरीत रुजू झाले. सदाशिवरावांच्या जन्माच्या वेळेला ते महालकरी होते. ते स्वकर्तृत्वाने असिस्टंट कलेक्टर म्हणजेच उपजिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचले. गोविंदरावांचे इंग्रजीवर प्रभुत्त्व होते. ते इंग्लंडला जाऊन आले होते. अतिशय निःस्पृह, शिस्तप्रिय, सत्यप्रिय आणि करारी अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. कामात अतिशय चोख असल्याने वरिष्ठांची त्यांच्यावर मर्जी असे. आपल्या या सर्व गुणांचा वारसा त्यांनी सदाशिवरावांना दिला.
सदाशिवरावांची आई या पूर्वाश्रमीच्या इंदिराबाई ही तासगावच्याच सधन आणि सुविद्य गोखले घराण्यातील होती. त्यांच्या वडिलांचा आरतीसंग्रह त्या काळी प्रसिद्ध होता. सदाशिवरावांना आईकडूनच काव्य आणि साहित्याचा वारसा मिळाला होता. सदाशिवरावांना घरी ‘बापू’ असे हाक मारीत. गोविंदरावांना बढती मिळाली आणि त्यांची विविध ठिकाणी बदली झाली. त्या निमित्ताने शिराळा, चाळीसगाव, जळगाव अशा अनेक ठिकाणी लहानग्या बापूची भ्रमंती झाली. त्यामुळे बापूचे प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झालं. जळगावला अण्णासाहेब हे कलेक्टरांचे चिटणीस म्हणून आले. गावाबाहेरील सरकारी बंगल्यात राहण्यासाठी गेले. तिथे राजवाडे नाना, देशपांडे, केळकरांचा मनोहर असे मित्र मंडळ जमले. सर्वांचे अभ्यासात त्यांच्या त्यांच्या वर्गात अग्रस्थान असे. सामाजिक दर्जापण सारखाच. हुशार समवयस्क मंडळींचा सहवास आणि आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने बालपण आनंदात गेलं.
पुढे गोविंदराव पुण्यास येऊन स्थिरावले आणि तिथेच बापूच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. गोविंदराव पुण्यात गावाबाहेरील सरकारी बंगल्यात न रहाता मुलांच्या शिक्षणाची गैरसोय होऊ नये म्हणून नारायण पेठेत पत्र्या मारुती जवळ रहावयास आले. त्या वेळच्या रिवाजानुसार त्यांच्याकडे त्यांचे पुतणे, भाच्चेही शिक्षणासाठी आलेले होते. बापूची थोरली बहीण येसुताई ऊर्फ अक्का, धाकट्या तारा नि कमल या दोघी बहिणी आणि बापू. बापू सर्वांचा लाडका होता. तो अतिशय खोडकर आणि खेळकर होता. या वाड्यात गोविंदरावांची ऑफिसची स्वतंत्र खोली होती. बापूंची आई अन्नपूर्णाबाई म्हणजे साक्षात् गृहलक्ष्मी ! या सर्व भाच्या, पुतण्यांचे हवे नको अगदी आपलेपणाने, आप पर भाव न धरता करत असत. दहा माणसांच्या रगाड्यात जो मुलगा दंगा किंवा खोड्या करेल त्याचं पान अण्णांच्या जवळ अशी शिक्षा असे. मुलांना ही शिक्षा खूप होई. अण्णासाहेब विचारीत ‘अरे या आठवड्यात जास्त वेळा तुझे पान माझ्याजवळ आले.’
शैक्षणिक जडणघडण : वयाच्या दहाव्या वर्षी बापूचे शिक्षण डेक्कन एज्युकेशनच्या नाना वाडा इथल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सुरू झाले. बापू प्रथमपासूनच हुशार. शाळेत त्याचा कायम पहिला नंबर असे. वडील जेवायला बसले की त्यांना इंग्रजी पेपर वाचून दाखवायचा दंडक वडिलांनी घातला होता. त्यामुळे बापूचे इंग्रजी उत्तम होते. आजीबरोबर देवळात पोथ्यापुराणे आणि कीर्तने ऐकायला बापू जात असे. त्यामुळे संस्कृत श्लोक, वीर पुरुषांच्या कथा आणि पोवाडे त्याला मुखोद्गत होत्या. गणित हा तर त्याचा अतिशय आवडीचा विषय. शाळेत आणि पुढे महाविद्यालयात वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेत बापूने यश मिळवले. त्याच्या पुढच्या देदीप्यमान कारकिर्दीची जडणघडण अशी बालपणापासूनच होत गेली. मॅट्रिकच्या परीक्षेत सदाशिवराव शाळेत पहिले आले आणि त्यानंतर त्यांनी हट्टाने फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पहिले वर्ष झाले आणि वडिलांनी सरकारी नोकरीतल्या निवृत्तीनंतर सांगलीचे दिवाण म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. कुटुंब सांगलीला गेले आणि सदाशिवराव वसतिगृहात राहू लागले. कॉलेजमध्ये भव्य ग्रंथालयात अभ्यासा- व्यतिरिक्त अनेक विषयांची पुस्तके वाचण्याचा त्यांनी सपाटा लावला. बर्वे स्वतः अतिशय हुशार तर होतेच; पण ते इतरांना मदत करायला सदैव तत्पर असत. कॉलेजातही अभ्यासात अग्रेसर, खेळात पुढे, स्पर्धांमध्ये विजय अशी घोडदौड चालू होती. वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांच्या निमित्ताने बर्वे आणि त्यांचे परममित्र कोगेकर यांची उत्तर हिंदुस्थानात अनेक ठिकाणी भ्रमंती झाली. या दौऱ्याच्या निमित्ताने कोलेजाने दिलेल्या शिफारशीमुळे अनेक विद्वानांची ओळख आणि पाहुणचार मिळाला, या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या ज्ञानात मोलाची भर पडत होती. दृष्टी व्योक झाली. राष्ट्रीय पातळीवरची ढाल ते मिळवू शकले नाहीत; पण त्यांना अनुभव चांगलाच मिळाला.
कॉलेजमध्ये बी.ए.च्या परीक्षेत त्यांनी अनेक शिष्यवृत्त्या आणि पारितोषिके मिळवली. या यशानंतर सदाशिवराव केंब्रिजला उच्च शिक्षणासाठी निघाले. कॉलेजने त्यांचा निरोप समारंभ ठरवला. त्यात त्यांचं अतिशय भावपूर्ण भाषण ऐकून सगळेजण निःशब्द झाले. आपले प्रिय गुरुवर्य प्राध्यापक डी.जी. कर्वे यांच्याबद्दल त्यांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. त्यांचे गुरु प्रा. डी.जी. कर्वे यांनी अर्थशास्त्रातील जे कॉब्डेन क्लब मेडल १९२१ साली घेतलं होतं, तेच बर्त्यांनी १९३४ साली मिळवलं. इतिहास आणि अर्थशास्त्र या संयुक्त विषयात सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला मिळणारं जेम्स टेलर पारितोषिक त्यांनी जिंकलं आणि इंग्रजीवर प्रभुत्त्व असल्याने एलीस प्राईझही मिळवलं. याच काळात सहाध्यायी असलेल्या शरयू गुप्ते या तरुणीशी त्यांचं मनोमिलन झालं.
लोकसंग्रहाची बीजे: लहानपणापासूनच माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत होती. त्यात सर्व त-हेच्या लोकांचा समावेश असे. कलावंत, कवी, लेखक यांच्याप्रमाणेच कुस्तीगीर खेळाडू अशा सर्व प्रकारच्या लोकांबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असत. स्वतः इतके कर्तबगार असूनही त्यांनी कधीही गर्व केला नाही आणि हीच गोष्ट पुढे त्यांच्या आयुष्यात त्यांना मोठेपणा देणारी ठरली.
विलायतेला जाऊन त्यांनी यशाची पताका उंचावतच नेली. केंब्रिजला स्वतंत्र मोकळं वातावरण होतं. विविध देशातील विद्यार्थ्यांचा सहवास लाभत होता. त्यातून त्यांची ज्ञानदृष्टी विस्तारत गेली. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या प्रयत्नांवर तिथे चर्चा चाले. पुण्यात डेक्कन एज्युकेशन संस्थेचे डोळस देशभक्तीचे संस्कार त्यांना लाभले होते. न्या. रानडे, नामदार गोखले, प्रा. वा.गो. काळे यांच्या परंपरेतील प्रा. डी.जी. कर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आपला देश, त्याचा इतिहास, राजकारण, आर्थिक दुःस्थिती यांचा आणि इतर पुढारलेल्या देशांच्या स्थितीचा तुलनात्मक अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळाली आणि त्यांनी डॉ. चिंतामणराव देशमुख, एम.डी. भट, पु.मं. लाड यांच्याप्रमाणेच सनदी सेवेत जाऊन देशाची सेवा करण्याचे ठरवले. ‘परीक्षा कोणतीही दिली आणि व्यवसाय कोणताही स्वीकारला तरी जीवनात प्रमुख विचार माझा देश आणि माझे देशबांधव यांचाच राहील,’ अशी जणूकाही त्यांनी तिथे शपथच घेतली.
केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या इंडियन सिव्हील सर्व्हिसेसच्या यशाबरोबरच अर्थशास्त्रातील ट्रायपॉस (ट्रायपॉस म्हणजे बी.ए., अर्थशास्त्र आणि आय.सी.एस. या तीनही परीक्षा) त्यांनी एकच वेळी प्राप्त केली आणि सन्मानाने भारतात परत आले. कॉलेजच्या सत्कार-सभेत ते म्हणाले, “ह्या कॉलेजने मला घडवले. या कॉलेजच्या परंपरा लोकसेवेच्या आहेत आणि मी राजसेवा पत्करली आहे; पण मी राजसेवा आणि लोकसेवा दोहोंचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करीन.”
कार्यकुशलतेची चुणूक सदाशिवरावांची २३ नोव्हेंबर १९३६ रोजी अहमदाबादमध्ये उपजिल्हाधिकारी पदावर नेमणूक झाली. अहमदाबाद इथे झालेल्या धार्मिक दंगलीत त्यांनी कठोर निर्णय धाडसाने घेतले आणि दंगल आटोक्यात आणली. पुढे वर्षभराने ताप्ती नदीवरील एका दुर्घटनेच्या चौकशी समितीवर काम करण्यासाठी सुरतचे उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांची बदली झाली. तिथे त्यांनी प्राध्यापक पाळंदे आणि महविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने आसपासच्या ग्रामीण भागातील रस्ते श्रमदानाने सुधारले, सुरतच्या कारकिर्दीत त्यांनी भारत जवळून अनुभवला. दैन्य, दुःख, अज्ञान यांनी ग्रासलेल्या लोकांच्या प्रश्नांना त्यांनी प्राधान्य दिलं. जिल्ह्याचा कानाकोपरा पिंजून काढला. आदिवासींचा भाग पालथा घातला. आदिवासी त्यांना भेटत आणि बर्वे त्यांचा न्यायनिवाडा जागेवरच करत, भेटीला आलेल्या खेडुतांशी ते त्यांच्या गुजराथी भाषेत बोलत आणि त्यामुळे त्यांना जवळचे वाटत. हाताखालच्या अधिकाऱ्याच्या रिपोर्टवर अवलंबून न रहाता स्वतः पाहणी करत. शेतकऱ्याशी संवाद साधत. काळीपरज या मागासलेल्या जमातीचा ज्वलंत प्रश्न त्यांनी तत्परतेने सोडवला.
१९३८ साली त्यांच्या जीवनात अनेक बदल घडले. ते सुरतला असताना त्यांचे वडील सांगली संस्थानचे दिवाण होते. एकदा कर्नाटकातील शिरहट्टी गावी हिंदू मुसलमान दंगल उसळली. अंगात ताप असतानाही दिवाणसाहेब तिथे गेले आणि रक्तदाब वाढल्याने त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. सदाशिवराव सुरतेहून पित्याच्या भेटीसाठी आले; पण त्यांनी पितृछत्र गमावले.
स.गो. बर्वे यांनी कॉलेजच्या शेवटच्या वर्षी कु. शरयू गुप्ते हिच्याशी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या होत्या. त्याची झळ त्यांच्या मनोनिग्रहावर किंवा अभ्यासात पडू न देता ते केब्रिजला जाऊन आय.सी.एस. होऊन आले. पूर्वी दिलेल्या वाचानला जागून त्यांनी शरयूशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २७ जून १९३८ रोजी मुंबईला ग्रँटरोड इथं सदाशिवराव बर्वे आणि शरयू गुप्ते यांचा वैदिक पद्धतीने विवाह झाला आणि सहजीवनाला सुरुवात झाली. धारवाड इथे मित्रमंडळींना बोलावून गायन वादन असे कार्यक्रम चालत. सुखी वैवाहिक काळ त्यांनी अनुभवला.
प्रशासन शिस्तबद्ध कार्य: १९३९ साली पुण्याचे असिस्टंट कलेक्टर आणि मॅजिस्ट्रेट म्हणून बर्थ्यांची नेमणूक झाली. पण दोनच महिन्यात सोलापूरला बदली झाली. पुढे लगेच ते मुंबईला गृहखात्याचे अंडर सेक्रेटरी म्हणून गेले. वर्षभरातच बढती मिळून डेप्युटी सेक्रेट झाले. नागरी पुरवठा तसंच अन्न आणि औषध विभागाचे अतिरिक्त संचालक म्हणून त्यां १९४३ सालपर्यंत काम बघितलं. त्यानंतर नोव्हेंबर १९४३ ते मे १९४७ या काळात त्या अहमदाबाद, धारवाड, पुणे इथे कलेक्टर आणि मॅजिस्ट्रेट या पदावर काम केलं.
धारवाड येथे कानडी भाषेचे धडे घेऊन त्यावर त्यांनी ती लवकरच अवगत केली ते जिथे जिथे कामासाठी गेले तिथे तिथे त्यांनी आपल्या कामाची विशिष्ट पद्धत सुरू करून दिली. प्रशासकीय कामाला शिस्त लावली. ते स्वतः अतिशय काटेकोरपणे आणि झोकून देऊन काम करत असत आणि आसपासच्या लोकांनी पण त्याच पद्धतीने काम करावं ही अपेक्षा करीत असत. आपल्या वडिलांचा कर्तबगार आणि करारी अधिकारी असलेला बाणा त्यांनी पुढे आपल्या कारकिर्दीत तंतोतंत पाळला. स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या पुढे किती आणि कोणत्या समस्या आहेत, किती प्रश्नांना आपल्याला तोंड द्यायचं आहे, याची पक्की जाणीव त्यांना होती. जिल्हाधिकारी हा राज्यशासनाचा त्या जिल्ह्याचा प्रतिनिधी मानला जातो.
स्वातंत्र्याच्या आधी फक्त शांतता आणि सुव्यवस्था राखणे हे जिल्हाधिकाऱ्यांचे काम असेल पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हे लोकराज्य झाले आहे, लोककल्याणासाठी कारभार करायचा आहे याची जाणीव त्यांना होती. म्हणून ते म्हणत असत, राज्यकारभार हे नुसते शास्त्र नाही तर ती एक कला आहे… प्रामुख्याने तो एक व्यवहार आहे. सुधारणा करताना ‘लोककल्याण’ ही एकच गोष्ट प्राधान्याने लक्षात ठेवली पाहिजे. इंग्रजी सत्तेत सनदी अधिकारी म्हणून काम केलेल्या इतर अधिकाऱ्यांच्या तुलनेत बर्वेची लोकसेवक असलेली वृत्ती खरोखरच दुर्मीळ अशी होती. हा वेगळा अधिकारी आहे, याची खात्री लोकांना पटली. आपले आचरण आपल्या बुद्धीच्या विचारांप्रमाणेच असावे हा प्रामाणिकपणा बर्वेच्या जवळ होता म्हणूनच ते लोकशासकही होते आणि लोकसेवकही होते. त्यामुळेच ते जिथे जिथे गेले तिथे लोकांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना निर्माण झाली.
प्रशासनाला आधुनिकतेचा स्पर्श: १८ मे १९४७ रोजी त्यांची पुण्याच्या कलेक्टर आणि मॅजिस्ट्रेट पदावर नियुक्ती झाली. नियमांच्या चौकटीत राहून राज्यकारभार कसा करावा याचं उदाहरण त्यांनी घालून दिलं. सनदी अधिकारी कार्यक्षम असेल तर हाताखालच्या मंडळींना काम करावंच लागतं. चांगल्या कामाची दाखल घेतली तर कामकाज सुधारण्यासाठी ते उपयुक्त ठरते आणि कामात हेळसांड किंवा दुर्लक्ष झाल्यास क्षमा केली जाणार नाही, ही जरब असेल तर तसे धाडस कोणी करू शकत नाही, हे धोरण त्यांनी अवलंबलं होतं. त्यामुळे ते कडक अधिकारी म्हणून ओळखले जात; पण स्वतः कामात अतिशय चोख असल्याने त्यांच्याविषयी आदर वाटे. जुन्या रेंगाळलेल्या कामांचा झपाट्याने निपटारा, दिलेली कामे विशिष्ट कालमर्यादेत पूर्ण करण्यावर भर, जुन्या दप्तरांची विल्हेवाट आणि पूर्ण झालेल्या कामांची योग्य नोंदणी अशी आधुनिक आणि कार्यप्रवण पद्धती त्यांनी राबवली. आज ज्याला ‘झीरो पेंडन्सी’ म्हणतात ती बर्वेसाहेबांनी त्यांच्या काळात राबवली.
३० जानेवारी १९४८ हा दिवस सदाशिवराव बर्वेच्या कार्यक्षमतेची कसोटी घेणारा ठरला. महात्मा गांधीजींची हत्या झाली होती. या कठीण काळात त्यांची ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणून नेमणूक झाली. देशभरात जनक्षोभ उसळला होता. एका महाराष्ट्रीयन ब्राह्मण माणसाने गांधीजींना मारलं या संतापाने अनेक ठिकाणी जाळपोळ सुरू झाली होती.
गांधी हत्या केलेले नथुराम गोडसे पुण्याचे होते. त्यामुळे पुणे शहर अतिशय संवेदनशील स्थळ झालं होतं. या आणीबाणीच्या काळात बर्वेनी जोखीम असलेल्या कुटुंबीयांना तर सुरक्षित स्थळी हलवलंच; पण स्वतःच्या अधिकारात लष्कराला पाचारण केलं. बर्वेना आपण घेत असलेल्या निर्णयाची, त्याच्या होणाऱ्या परिणामांची पूर्ण कल्पना होती. त्याची जबाबदारी घेण्याची त्यांची तयारी होती. ते अतिशय काटेकोरपणे आज्ञा देत होते आणि अधिकारी त्यांच्यावरच्या विश्वासाने त्या पाळत होते. संचारबंदी लागू झाली. पुणे शहराची नाकेबंदी झाली. सर्वांना आपापल्या परीने सुरक्षितता मिळाली. नंतरच्या शांततेच्या काळात ‘बर्वे होते म्हणून अनर्थ टळला’ असे उद्गार अनेकांनी काढले.
पुणे महानगरपालिका स्थापन करायचे ठरले आणि त्याचे पहिले आयुक्त म्हणून सदाशिवराव बर्वे यांची निवड करण्यात आली. पण पुण्यात रुजू व्हायच्या आधी मुंबई महानगरपालिकेचे कामकाज महिनाभर त्यांनी अभ्यासले. पुण्याचे जुने अहवाल त्यांनी वाचलेले होते. इथे कोणकोणत्या विभागात काय प्रकारचं काम करायचं आहे याची पूर्ण कल्पना त्यांना आलेली होती. पुण्याची महानगरपालिका नव्याने स्थापन झालेली होती. नव्या निवडणुका झालेल्या नव्हत्या, त्यामुळे लोकनियुक्त सभासदांची त्यांना टोचणी नव्हती. सल्लागार मंडळ होते; पण बर्वेसाहेबांचा आधीचा नावलौकिक ते जाणून होते त्यामुळे कारभारात त्यांनी फार लक्ष दिलं नाही आणि ते बर्वेसाहेबांच्या पथ्यावर पडलं.
ते इथे आले तेव्हा अत्यंत अकार्यक्षम महापालिका असा पुणे पालिकेचा लौकिक होता. करवसुली, रस्ते, ड्रेनेज, औषधोपचार व्यवस्था यांकडे दुर्लक्ष झालं होतं. कर्मचाऱ्यांची संख्या पाच हजार होती. त्यांना हाताशी धरून कारभार सुधारण्याचं धोरण बर्वेसाहेबांनी अवलंबलं. करवसुलीची थकबाकी १७-१८% होती. कर भरलेला नसेल तर तो कोणीही असो त्याच्यावर कायद्यानुसार कार्यवाही होऊ शकते हे लोकांना जाणवून देण्यात बर्वे यशस्वी ठरले आणि सहा महिन्यात कराच्या थकबाकीचं प्रमाण २.५० टक्क्यांवर आलं. हा एक विक्रमच म्हण्याला हवा!
नियोजनबद्ध विकासाचा श्रीगणेशा : जानेवारी १९४९ ते जून १९५२ या अवघ्या साडेतीन वर्षाच्या काळात सदाशिवराव पुणे महानगरपालिकेचे प्रशासक होते. १९४९ साली त्यांनी आयुक्त म्हणून कामास सुरुवात केली. सुरुवातीच्या सुमारे दीड वर्षात पालिकेत नगरसेवक नसल्याने सर्व सत्ता बर्वे यांच्याकडेच होती. त्यामुळे आपल्या अधिकारात त्यांनी भराभर कामं करण्याचा सपाटा लावला.
पण त्यांची नियुक्ती झाली तेव्हाच त्यांच्याकडे पुढील तीन वर्षात करण्याच्या कामाचा आराखडा तयार होता. अतिशय नियोजनबद्ध रीतीने त्यांनी पुण्याचा विकास घडवून आणला. रस्ते, पूल, वीज, दवाखाने, पाणी पुरवठा, सांडपाणी निचरा, गृहप्रकल्प अशा अनेक गोष्टींचा संपूर्णपणे विचार करून पुढील पंचवीस वर्षांच्या ‘सुंदर पुणे’ या संकल्पनेचा पाया त्यांनी घातला. महापालिका, कॅन्टोन्मेंट, पाटबंधारे विभाग, बांधकाम, आरोग्य, शिक्षण, टपाल खाते, टेलीफोन या सर्व खात्यांमध्ये त्यांनी सुसूत्रता आणली. त्यांच्या कामाचा पाया शास्त्रशुद्ध आणि नियोजन पक्के असल्याने आणि योग्य कामासाठी योग्य अधिकाऱ्याची निवड करण्याचे धोरण असल्याने कामाला गती आली. पूर्वी मजुरांना माहिती नसायचे की कुठे जायचे आहे आणि काय काम करायचे आहे. दिलेला हुकूम फिरवला जाई आणि मजुरांचा दिवस आणि हेलपाटा वाया जाई. ही पद्धत त्यांनी मोडीत काढली. कोणत्या दिवशी कोणत्या भागात कोणत्या प्रकारचे काम करायचे आहे याचा पूर्ण तपशील तयार असायचा त्यामुळे कामं वेळेत पूर्ण होऊ लागली. पुणे शहराचा चेहरामोहरा बदलू लागला. पुण्यात त्या वेळेला कमीतकमी खर्चात कामं व्हावीत म्हणून ‘सेन्ट्रल स्टोअर’ ही अभिनव कल्पना राबवून त्यांनी कारखान्यातून थेट माल मागवायला सुरुवात केली.
रस्ते : त्या वेळी पुण्यातील रस्त्यांवर खड्डे पडले होते. त्यात पावसाचे पाणी साचून चिखल होत असे. उन्हाळ्यात रस्ते धुळीने भरून जात. काही रस्त्यांचे डांबरीकरण झाले होते; पण अगदी थोडे. बर्वे आले आणि दोन वर्षात ४० मैल रस्त्यांचे डांबरीकरण झाले. सर्वात प्रथम जंगली महाराज रस्ता ८० फूट रुंद केला गेला. तिथल्या चौकाला आता ‘स.गो. बर्वे चौक’ असं नाव दिलं आहे. मध्यभागी तीस फूट रुंदीचा डांबरी रस्ता आणि दोन्ही बाजूला दहा फुटाचे काँक्रीटचा रस्ता सायकलसाठी राखीव करण्यात आला. आणि दोन्ही बाजूला १५-१५ फुटांचे पदपथ केले. नामदार गोखले मार्ग म्हणजेच फर्ग्युसन कॉलेज रस्ता सगळीकडे सारख्या रुंदीचा करून घेतला गेला. मधला भाग ३० फूट आणि दोन्ही बाजूस १० फुटाचे पदपथ अशी रचना केली गेली. लक्ष्मी रस्त्याचे अनेक वर्ष रेंगाळत पडलेले काम बर्वेसाहेबांनी चातुर्याने पूर्ण केले. रस्ता रुंदीकरणात आड येणारे मंदिर रातोरात हटवले. लोकांच्या सोयीसाठी पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आली. सोडियम व्हेपर लॅम्प्स बसवून घेतले. धोक्याचे कोपरे गोलाकार करून घेणे, अरुंद रस्ते रुंद करणे, जड वाहनांना शहरात न येता परस्पर बाहेरून जाता यावे यासाठी सोय करणे अशा अनेक पायाभूत कल्पना त्यांनी मांडल्या आणि त्यातल्या बव्हंशी पूर्ण केल्या.
आरोग्य : शहरातील रुग्णालयांचा दर्जा सुधारणे ही पहिली निकडीची गरज होती. महानगरपालिका अस्तित्वात आल्यावर लगेचच दोन वेळा कॉलऱ्याची साथ आली. रोगाचे निदान लवकर व्हावे म्हणून पालिकेने लॅबोरेटरी सुरू केली. कचऱ्याचे आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे हे जाणून या गोष्टी सुधारण्यावर भर दिल गेला. हिवताप नियंत्रणासाठी शहरभर फवारणी सुरू करण्यात आली. देवी रोगाच्य निर्मूलनासाठी डॉ. आद्रनवाला यांनी बव्र्त्यांना मोलाची मदत केली.
मार्केट : वाढत्या शहराचा संभाव्य विस्तार लक्षात घेऊन बर्वेनी वेगवेगळ्या भाग मार्केट वसवण्याचे नियोजन केले. खाटिकखान्यात कोणती जनावरे न्यावी याचे नियम घाट दिले आणि त्याच्या वेळा ठरवून दिल्या. शहरात मध्यभागात पसरलेल्या टिंबर मार्केटस बाहेर जागा उपलब्ध करून दिली. पण व्यापारी हलायला तयार होईनात तेव्हा बर्वेनी त्य परवाना अडवून ठेवला. त्यांनी चातुर्याने कायद्याचा योग्य उपयोग करून घेतला. हळूहळू मार्केट नवीन जागी गेले.
उद्याने आणि बागा : शहर नियोजनाभावी कसेही वाढले होते, एकप्रकारचा विस्कळीतपणा जाणवत होता. त्यात लोकांच्या सोयीसुविधांचा विचार अभावानेच गेला होता. हे सगळं बदलायचं तर त्यासाठी लोकांना विरंगुळा मिळेल, शुद्ध मोकळेपणाने हिंडता येईल अशी सोय करणे गरजेचे होते. म्हणून बर्वेसाहेबांनी बागा उद्याने विकसित करण्याची योजना आखली. शहराची शोभा वाढवणारी उद्याने त्यातील वृक्षसंपदा जोपासण्यासाठी वनविभाग सक्षम करण्यावर त्यांनी भर दिला. बाग’ तसंच ‘पेशवे पार्क’ यांच्या निर्मितीची पूर्ण संकल्पना बर्वेसाहेबांचीच ! संभाज तयार करण्यात आलेले मत्स्यालय, बँडस्टँड, कारंजी आणि वृंदावन गार्डनप्रमाणे अंडरवॉटर रंगीत दिवे, दोन्ही बाजूंनी सोंडेतून पाणी सोडणाऱ्या आणि मध्ये लक्ष्म असलेल्या लेण्याची निर्मिती, लहान मुलांना खेळायला भाड्याने तीन चाकी सायक छोट्या मोटारी चालवण्याची सोय आणि रस्ते त्यांनी करवून घेतले.
दिवाळीत लहान मुलांच्या किल्ले तयार करण्याच्या स्पर्धा, बागकामाच्या स्पर्धा, फळफूले यांचे प्रदर्शन हे सर्व संभाजी बागेत त्यांनी केलं. खत निर्मितीची योजना करून त्यांनी त्यातून उत्पन्न मिळवून दिलं.
पेशवे पार्क येथे थोडक्या खर्चात केलेली कलात्मक रचना, लहान मुलांसाठी फुलराणीची कल्पना, बोगदा, जपानी पागोडा आणि पूल तसंच बोटिंगची सोय, मुलांची लाडकी सुमित्रा हत्तीणीची स्वारी, प्राणी संग्रहालय या लहान मुलांच्या सहलीसाठी विकसित केलेल्या सोयी यातून त्यांच्या आधुनिक विचारशैलीची झलक पाहायला मिळते.
नदी सुधार योजना : नदीचे तेव्हाचे स्वरूप बदलायला हवे याची बर्वेसाहेबांना जाणीव होती. नदीपात्राच्या दोन्ही बाजूला असलेली विस्तीर्ण हिरवळीची जागा लहान मुलांना खेळण्यासाठी मोकळी पटांगणे म्हणून विकसित करावी अशी कल्पना त्यांनी मांडली. मैदानांचे रूपांतर पटांगणे आणि क्रीडांगणात करून त्यांनी नागरिकांसाठी चांगलीच सोय केली.
उद्योगधंदे : पुण्याचा विविध बाजूंनी विकास सुरू झाला. इंजिनियर्स लोकांना प्लॅन्स बनवायला सांगून ते खर्चाचा अंदाज घेत. त्याप्रमाणे किती पैसे लागतील, त्याची तरतूद कशी करायची, याचा विचार करताना त्यांच्या लक्षात आलं की शहराचे आणि शहरवासियांचे उत्पन्न वाढवायचे तर उद्योगधंदे सुरू करायला हवेत. पुणे-चिंचवड, पुणे- सातारा, पुणे-हडपसर अशा अनेक मार्गांवरील मोकळ्या जागेत त्यांनी औद्योगिक वसाहती निर्माण करण्याची योजना आखली. तिथले गाळे लोकांना कमी किमतीत उपलब्ध करून दिले आणि उद्योग व्यवसायाला चालना दिली. नवनवे कारखाने उभे राहू लागले आणि पालिकेचे उत्पन्न वाढू लागले. औद्योगिक वसाहती निर्माण करणे हे कार्य संपूर्ण महाराष्ट्राला पथदर्शक ठरले आहे.
ते सकाळी सात वाजल्यापासून काम सुरू करत. त्यांचा कामाचा झपाटा विलक्षण होता. पूर्वीच्या काळी जसे राजे महाराजे वेश बदलून प्रजेमध्ये जाऊन त्यांची सुखदुःख समजून घेत तसेच बर्वेसाहेबही न सांगता अचानक एखाद्या कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करत. ते काम कोण पाहते आहे, ते सध्या कोणत्या स्थितीत असायला हवे हे त्यांना माहिती असे. आणि जर ते तसे नसेल तर त्या अधिकाऱ्याला त्याचे कारण द्यावे लागे. अगदी सकाळी व्यायामासाठी फिरायला जातानाही ते अचानक एखाद्या कामावर जात असत. त्यामुळे लोकांना त्यांचा दरारा वाटे आणि कामे लवकर पूर्ण होण्यासाठी त्याची मदत होत असे. बर्वेसाहेब कोणत्याही गोष्टीची आखणी करण्याआधी त्या गोष्टीचा सांगोपांग विचार करत, अधिकारी आणि तज्ज्ञांचा सल्ला घेत, मालाअभावी कामे अडू नयेत म्हणून कच्च्या मालाची पुरेशी तरतूद करत आणि त्यातूनही काही अडचणी आल्या तर त्याला तोंड देण्यासाठी त्यांच्याकडे दुसरा पर्यायी आरखडा (प्लॅन) तयार असे. एकदा ड्रेनेज खात्यातील मजुरांनी संप करण्याची धमकी दिली. त्यांच्या रास्त मागण्या मान्य करूनही ते संप मिटवायला तयार होईनात तेव्हा सोलापूर, सुरत, मुंबई इथून पर्यायी मजूर आणण्याची व्यवस्था त्यांनी केली आणि संप मोडून काढला. त्यांचे कोणतेही काम वेळापत्रकानुसार चाले. दर सोमवारी कामाच्या वेगाचा तपशील दाखवणारे पत्रक त्यांच्या टेबलावर आले पाहिजे, असा नियम त्यांनी घालून दिला होता. आठवड्यातील एकेक दिवस एकेक विभागवार मुख्य ऑफिसला दिलेला असे. कामाची प्रत्यक्ष पाहणी आणि चर्चा यांमुळे काम अडून राहात नसे. निर्णय तत्परतेने दिले जात असत.
नगरपालिकेच्या कामाचा वार्षिक अहवाल वेळेवर निघाला पाहिजे, यावर त्यांचा कटाक्ष होता. मुंबईला जाताना अनेक प्रकरणे घेऊन जात आणि महानगरपालिकेची बाजू खंबीरपणे मांडून त्या प्रकरणाचा निकाल लावून येत.
या सर्व कार्यात त्यांना मोलाची साथ मिळाली ती त्यांच्या सहकार्यांची. श्री. नेऊरगावकर, श्री. आद्रानवाला, श्री. जाधव अशा अनेक कार्यक्षम अधिकाऱ्यांच्या कारकिर्दीची जडणघडण बर्वेसाहेबांच्या संगतीने झाली. सर्वांच्या मनात बर्वेसाहेबांविषयी अपार कृतज्ञता होती.
आत्ता आपल्या पुण्यात मेट्रो आली म्हणून आपण सगळे आनंदून गेलो आहोत. पण या पुण्याभोवती गोलाकार पद्धतीने रेल्वे सेवा उपलब्ध व्हावी अशी नुसती इच्छा व्यक्त करून न थांबता त्याचा संपूर्ण आरखडा बर्वेसाहेबांनी त्या काळी तयार केला होता. भविष्यात होणाऱ्या सार्वजनिक वाहतुकीसाठी पी.एम.टी. अपुरी पडणार आणि पुण्याभोवती वाढती लोकसंख्या बघता सबअर्बन वाहतुकीची गरज भासणार हे लक्षात घेऊन दापोडी, खडकीपासून सुरू होणारी गोलाकार रेल्वे पुण्याचा पश्चिम भाग, दक्षिण भाग, पूर्व बाजूला मार्केट यार्ड परिसर, पुढे मिरज, सोलापूर रेल्वे लाईन, मुळा-मुठा ओलांडून येरवडा, वडगाव शेरी, खराडी, लोहगाव, विश्रांतवाडी, धानोरी येथून पुन्हा कासारवाडीला येऊन मिळेल असा वैशिष्ट्यपूर्ण मार्ग १९५२-५४ च्या सुमारास आखणारे स. गो. बर्वे हे किती द्रष्टे होते याचं प्रत्यंतर येतं.
वेळेच्या बाबतीत ते अतिशय काटेकोर होते. आपला वेळ इतर गप्पाटप्पांमध्ये जाऊ नये. म्हणून त्यांनी टेबलावर दोन लहान पाट्या लिहून ठेवल्या होत्या. I am busy आणि Please be brief. ‘मी कामात आहे’ आणि आणि ‘आपले म्हणणे थोडक्यात सांगा’ या पाट्यांबरोबरच मुंबई कॉर्पोरेशनचे संस्थापक फिरोजशहा मेहता यांचे एक वचन त्यांनी खोलीत मुख्य जागी लावले होते, ‘अधिकाराची अंमलबजावणी बिनधोक आणि कार्यक्षमतेने व्हावयास हवी असेल तर तो अधिकार एकच व्यक्तीचे हाती सुपूर्द करावा.’ (युनिटी ऑफ कमांड)
त्यांच्या ऑफिसात मागील भिंतीवर एक फलक होता, ‘मी एक रस्त्याने जाणारा प्रवासी आहे आणि आज इथे मुक्काम केला आहे. मला जे काही चांगले करायचे असेल ते आत्ताच केले पाहिजे’. जीवनाविषयी त्यांचा दृष्टिकोन असा होता. आणि त्यामुळेच ते सतत कार्यरत असत.
आपल्या परिचितांनी, नातेवाइकांनी आपले काम करून घेण्यास आपल्याला भीड घालू नये म्हणून ते प्रसंगी कठोरपणे वागत. हस्तक मध्यस्थांना त्यांच्या कचेरीत मज्जाव होता. पण रास्त तक्रार किंवा मागणी असेल तर त्याचा जरूर विचार करत. इथे एक उदाहरण देणे उचित ठरेल. थोरल्या माधवरावांच्या थेऊर येथील वाड्याची वास्तू राम माधव स्मृती मंडळाला मिळावी यासाठी महामहोपाध्याय द.वा. पोतदार यांनी बर्वेसाहेबांना विनंती केली आणि लगेच ते काम मार्गी लागले. बर्वेसाहेबांना आपल्या इतिहासाचा अभिमान होता. थोरल्या बाजीरावांचे जीवन चरित्र लिहावे, अशी त्यांची इच्छा होती; पण कार्यबाहुल्यामुळे त्यांना यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. पुणे महानगरपालिकेतून बदली झाल्यावर मुख्यमंत्री, पंतप्रधानांपासून सर्वांनी त्यांची मुक्त कंठाने प्रशंसा करावी हे त्यांचं कर्तृत्व !
दिल्लीतील कारकीर्द : जून १९५२ मध्ये बर्वेसाहेबांची नेमणूक दिल्लीला पुनर्वसन मंत्रालयात झाली. खरंतर पुण्याबाबत त्यांनी योजलेली अनेक कामे बाकी होती; पण सनदी अधिकारी असल्याने त्यांना सरकारी हुकूम मोडणे शक्य नव्हते. ते जरा नाखुशीनेच दिल्लीला गेले. पं. नेहरू आणि चिंतामणराव देशमुख यांनी त्यांच्यावर् फरीदाबाद उभारणीची जबाबदारी दिली. फरीदाबादची स्थिती अतिशय वाईट होती. कार्यालयातला टेलीफोनसुद्धा नादुरुस्त होता. पण शून्यातून काम सुरू करून बर्वेसाहेबांनी एका वर्षात फरीदाबाद शहराचा कायापालट केला.
अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांनी सदाशिवरावांना आपल्या खात्यात सहसचिव म्हणून रुजू करून घेतले. तिथेही अतिशय महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सक्षमपणे पार पाडल्या. या पदावर असताना इम्पिरियल बँकेचे स्टेट बँकेत रूपांतर आणि अनेक इन्शुरन्स कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करून ‘लाईफ इन्श्युरन्स कॉर्पोरेशन’ मध्ये विलीनीकरण ही कामे त्यांनी केली.
‘केंद्र सरकारच्या आंतरराज्य विक्रीकर कायद्याच्या अत्यंत किचकट प्रश्नांची उकल करताना श्री. सदाशिवराव बर्वे यांनी जे कौशल्य दाखवले ते त्यांच्या केंद्रीय अर्थखात्यातील यशस्वी कामाचे जणू शिखर होते,’ अशा शब्दात खुद्द चिंतामणराव देशमुख यांनी बर्वेसाहेबांचे कौतुक केले.
भाषा मंडळाचे काम: नव्याने स्वातंत्र्य मिळालेले असल्याने त्या काळी भाषावार प्रांतरचना आणि भाषा प्रश्नांची संवेदनशील बाबा हाताळण्यासाठी भाषा मंडळाची स्थापन झाली होती. त्याचे अध्यक्ष होते पहिल्या लोकनियुक्त मंत्रिमंडळाचे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर. स. गो. बर्वेना खेरसाहेबांनी आग्रहाने सचिव म्हणून भाषा मंडळात बोलावून घेतले. बर्वेसाहेबांचे मराठी, इंग्रजी, संस्कृत, हिंदी, गुजराथी, कानडी आणि उर्दू भाषेवर प्रभुत्व होते. भाषामंडळाच्या देशभरातील दौऱ्याचे नियोजन अतिशय कल्पकतेने काढून त्यांनी तो यशस्वीपणे पूर्ण केला. बर्वे यांची सर्वगामी कुशाग्र बुद्धी, अत्यंत गुंतागुंतीच्या प्रश्नांचा आशय चटकन ओळखण्याची शक्ती आणि सदैव सौजन्यशील आणि सभ्य वागणूक यांचा मंडळाच्या सदस्यांवर कायमचा ठसा उमटलं आहे. चौकशीच्या शेवटी साक्षीपुराव्यांची छाननी करून आमचे निष्कर्ष आणि शिफारशी योग्य प्रकारे मांडण्यास त्यांची फार मदत झाली. मतभिन्नतेच्या वेळी एकवाक्यता कोठवर येऊ शकते हे ते शोधत असत. ‘बर्वे यांच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेची जोड भाषा मंडळाला मिळाली नसती तर हे काम ठरावीक वेळेत योग्य पद्धतीने पूर्ण झाले नसते,’ असं बाळासाहेब खेर यांनी मंडळाच्या अहवालाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे.
कोयना प्रकल्प निधीअभावी रखडला होता. तेव्हा कोयना प्रकल्पाचा बर्वेसाहेबांनी साद्यंत अभ्यास केला. अमेरिकेत जाऊन योजनेचे स्वरूप तेथील तज्ज्ञांना पटवून दिले आणि जागतिक बँकेकडून दोन कोटी पन्नास लाख डॉलर्सचे कर्ज मंजूर करून घेतले. त्यांचा अभ्यास आणि आराखडा इतका शास्त्रशुद्ध असे की इंजिनियर्सही चकित होत असत. स्वतःचा विषय नसूनही ते इतके कसे बोलू शकतात, असा प्रश्न लोकांना पडे आणि यावर मनुष्याला बुद्धी असली आणि तिच्यावर विशिष्ट तऱ्हेने विचार करण्याचे संस्कार झाले तर यात अवघड काहीच नाही,’ असे विनम्र उद्गार ते काढत.
राज्य सरकारच्या एस.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून १९५६ साली ते रुजू झाले. दापोडी, सातारा, भोर इथे त्यांनी स्थानकांसाठी जागा घेतल्या. मुंबई सेन्ट्रल इथे उभी असलेली एस.टी. महांदालाची वास्तू त्यांच्या कारकीर्दीत झाली.
१९५७ च्या मे महिन्यात त्यांची नियुक्ती मुंबईला पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटला झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर ते पहिल्या सिंचन आयोगाचे अध्यक्ष झाले. सिंचनावरच शेती आणि उद्योगधंदे अवलंबून आहेत हे जाणून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा काढून संशोधन केले. त्या वेळच्या प्रमाणांच्या सहापट जमीन सिंचनाखाली आणण्याची शिफारस आपल्या अहवालात केली.
ग्रेटर बॉम्बे कमिशनवर असताना १९५९ साली त्यांनी मुंबई विकासाच्या अनेक योजना आखल्या. वांद्रे कुर्ला खाडीत भर घालून तिथे मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांच्या वसाहती निर्माण कराव्या, अशा सूचना अहवालात केल्या. १९६० साली औद्योगिक विकास मंडळात काम करत असताना अनेक ठिकाणी औद्योगिक वसाहती निर्माण करून त्यांनी राज्यातील उद्योगविषयक संस्थांची उभारणी करायला सहकार्य केलं. मुंबईचा औद्योगिक बोजा कमी करून जिल्हा स्तरावर महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MIDC) स्थापण्याची कल्पना त्यांचीच. या कामाचा झपाटा मोठा होता. पुण्याजवळ १०,००० एकर जमीन संपादन करून भोसरी MIDC सुरू झाली. त्यातून दीड लाख रोजगार तयार झाले. ठाण्याची वागळे इस्टेट आणि इतर अनेक औद्योगिक वसाहती, मुंबईतले खाडी पूल, दोन्ही एक्स्प्रेस हायवेज या महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी मंजूर करून घेतल्या. शासन सुधारणा आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कडक शब्दात अहवाल सदर करण्याचं धारिष्ट्य दाखवलं. सत्ताधारी काँग्रेस पक्षावर सप्रमाण टीका केली. यशवंतराव चव्हाण यांनी हा अहवाल गांभीर्याने घेण्याची सूचना सरकारला केली होती, हे लक्षात घेण्यासारखे आहे. विभाजन समितीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून बर्वेसाहेबांनी मुंबईसह महाराष्ट्र निर्मितीमध्ये मोलाची कामगिरी केली.
पानशेत धरण समस्या आणि बर्वेसाहेब : १२ जुलै १९६१ या दिवशी पानशेत धरण फुटले. आपल्या प्रिय पुण्याच्या रक्षणासाठी बर्वेसाहेब धावत आले. त्यांची उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. त्यांनी भराभर निर्णय घेण्यास सुरुवात केली. सरकारी अधिकाऱ्यांच्या विश्रामगृहाचे रूपांतर वॉर रूममध्ये करण्यात आले. या काळात ते दिवसाचे २०-२० तास काम करत असत. सात लाख लोकवस्तीच्या या शहराचे पुनर्वसन ही साधी बाब नव्हती. आधी सगळा गाळ आणि घाण काढून स्वच्छता सुरू केली. रोगराई पसरू नये, म्हणून आरोग्य सुविधा देण्यात आल्या. पहिल्या चार दिवसांत वीज आणि पाणीपुरवठा सुरळीत झाले. दोन आठवड्यात तीन लाख लोकांना प्रतिबंधक लस टोचून झाली. १०० केंद्रात ३६,००० नागरिकांना निवारा मिळाला. खडकवासल्याचा मुख्य स्रोत बंद झाला आणि बंधाऱ्याच्या दुरुस्तीला वेळ लागणार हे दिसत होते. मुळशी धरणातून पुण्यात पाणी आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयोग तीन महिन्यात पूर्ण झाला. पूरस्थिती नियंत्रणात आणतानाच सर्व सरकारी विभागांचा ताळमेळ राखत त्यांनी प्रशंसनीय काम केले. त्यामुळे त्यांचे हेच काम पुणेकरांच्या अधिक लक्षात राहिले. पाणीपुरवठा, वीजपुरवठा, संपर्क व्यवस्था पूर्ववत् करण्यासाठी त्यांनी अनेकांची मदत घेतली. लोकांना तातडीची मदत, दळणवळण यासाठी ट्रक मालकांना अल्पदरात ट्रक देण्याची विनंती करून ट्रक ताब्यात घेतले. त्या मंडळींनीही बर्वेसाहेबांच्या शब्दासाठी माणुसकीच्या दृष्टीने पूर्ण सहकार्य केलं. शहराची पुनर्बाधणी, नव्या वसाहती वसवण्याचा आराखडा अशी अनेक पातळ्यांवरची लढाई अथक परिश्रमांनी त्यांनी यशस्वी करून दाखवली. प्रसंगी लष्कराचे सहकार्य घेतले. दोनतीन महिन्यात परिस्थिती काबूत आणली. पैशांच्या व्यवहारात अतिशय चोख असलेले बर्वेसाहेब स्वतःच्या कोणत्याही खर्चाचे बिलाचे पैसे चेकने भरत. त्यांना भ्रष्टाचार आणि लांगूलचालन याचा अतिशय राग होता.
सक्रिय राजकारणात प्रवेश: सनदी अधिकारी असला तरी त्याच्या अधिकारावर मर्यादा असतात, याची जाणीव त्यांना होऊ लागली आणि लोककल्याणासाठी हातात सत्ता असायला हवी, असं वाटू लागलं. यशवंतराव चव्हाणांच्या आग्रहामुळे त्यांनी सनदी नोकरीचा राजीनामा दिला आणि सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. १९६१ मध्येच पुण्यातून काँग्रेसपक्षातर्फे निवडणूक लढवून ते विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले. त्यांच्याकडे अर्थखात्याची जबाबदारी देण्यात आली. पुढे वसंतराव नाईकांच्या काळात त्यांनी उद्योगमंत्री म्हणून काम केलं. त्यांच्या कामाची दखल घेत पंतप्रधान लाल बहादुर शास्त्रींनी त्यांना नियोजन मंडळावर उद्योग विभागाचे सदस्य म्हणून नेमलं. ठाणे, बेलापूर, खोपोली, पनवेल, औरंगाबाद, चिपळूण इथल्या औद्योगिक वसाहती आजही त्यांच्या कार्याची साक्ष देत उभ्या आहेत.
१९६५ मध्ये केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. दिल्लीला आपले लोक आपल्या मागण्या मांडण्यासाठी एकत्र येत नाहीत आणि उत्तम नियोजन करूनही अंमलबजावणी नीट होत नाही, याची खंत त्यांनी परखडपणे मांडली. ते सनदी अधिकारी होते, राजकारणी नव्हते. त्यांना समाजाच्या भल्यासाठी काम करायचे होते. त्यांना सत्ता, खुर्ची आणि मानपान यात रस नव्हता आणि तो त्यांचा पिंडही नव्हता. त्यांच्या बाबतीत त्यांचे कार्यच सर्व काही होते. निवडणुकीत त्यांची ओघवत्या शैलीतील भाषणे आणि कळकळीचे सांगणे लोकांना भिडत असे आणि म्हणूनच १९६७ साली प्रस्थापित कृष्ण मेनेन यांच्या समोर निवडणुकीत ते विजयी झाले. दिल्लीला ते मंत्रिमंडळात अर्थ किंवा उद्योगमंत्री नक्कीच झाले असते; पण दुर्दैवाने त्या आधीच ६ मार्च १९६७ या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली.
कौटुंबिक बर्वे : या सगळ्या धामधुमीच्या आणि कारकिर्दीला संपूर्णपणे वाहून घेतल्याच्या काळात कुटुंबाकडे दुर्लक्ष होणं स्वाभाविक होतं. त्यामुळे विवाहानंतर बारा वर्षांनी त्यांची पत्नी शरयू गुप्ते-बर्वे त्यांच्यापासून विभक्त झाल्या. बर्वेसाहेबांचं आपल्या आईवर प्रेम होतं. ते वेळातवेळ काढून थोड्या काळासाठी हा होईना; पण आईला भेटायला येत असत. बहिणी भावंडांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. बाहेरचा मोठेपणा या नात्यात त्यांनी कधीही येऊ दिला नाही. त्यांची भावंडेही सुविद्य होती. आपल्या या निःस्पृह, निग्रही, शिस्तप्रिय आणि तरीही प्रेमळ भावाचा सर्वांना अतिशय अभिमान वाटत असे.
बर्वेसाहेब सौंदर्याचे भोक्ते होते. राहणी साधी; पण त्यांची निवड मात्र चोखंदळ होती. नीटनेटके राहणे त्यांना आवडत असे. आपल्या भावंडांचे गुण पारखून त्यांच्याकडून योग्य ते काम ते करून घेत. प्रोत्साहन देत. काव्य साहित्य याची बर्वेसाहेबांना अतिशय आवड होती आणि अशा लोकांबरोबर त्यावर चर्चा करण्यात ते रमून जात. कविवर्य ग.दि. माडगूळकर यांच्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. सांगलीच्या पद्मिनीराजे यांच्याशी त्यांचा स्नेह जुळला. त्यांच्या मुलांना त्यांनी पितृवत प्रेम आणि संस्कार दिले.
आपल्या कर्तृत्वाने आपल्या घराण्याचे, गावाचे, राज्याचेच नव्हे; तर देशाचेही नाव उंचावणारे बुद्धिमान प्रतिनिधी, कुशाग्र बुद्धीच्या जोडीला विलक्षण परीश्रमांची जोड मिळाल्याने प्रत्येक क्षेत्रात तेजाने तळपणारे उत्तम प्रशासक, संवेदनशील समाजसेवक आणि प्रेमळ कुटुंब प्रमुख असं बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या स.गो. बर्वे यांना शतशः प्रणाम !
त्यांच्या कार्याची व्याप्ती बघता हे अल्पचरित्र पुरेसं नाही याची विनम्र जाणीव आहे पण त्यांच्या कार्याची थोडक्यात का होईना माहिती व्हावी आणि पुढील पिढीला त्यातून प्रेरणा मिळावी या हेतूने ही पुस्तिका तयार केली आहे.
— डॉ. श्री. ग. बापट यशश्री पुणेकर
Leave a comment